मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाची हत्या. ८ आरोपींना अटक.
मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील भयानक प्रकार. पूर्वीच्या वैरातून एका दलित तरुणाला अमानुष प्रकारे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी आईला नग्न केले होते, असा आरोप तरुणाच्या बहिणीने केला आहे.
“मृत तरुणाचे नाव नितीन अहिरवार (लालू) असे असून तो १८ ते २० वयोगटातील होता. सागर जिल्ह्यातील बडोदिया नोनागीर गावात तो राहत होता. १३ जणांनी त्याला आधी बेदम मारले. सागर जिल्ह्यातील रूग्णालयात उपचारासाठी जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. ९ आरोपींची ओळख पटली असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर आयपीएस कलम ३०२ व एससी/ एसटी च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, असे एएसपी संजय उईके यांनी सांगितले आहे.
‘मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका दलित तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. गुंडांनी त्याच्या आईलाही सोडले नाही. सागरमध्ये संत रविदास मंदिर बांधण्याचा आव आणणारे पंतप्रधान मध्य प्रदेशातील दलित-आदिवासींवर सातत होत असलेल्या अत्याचारांवर मौन बाळगून आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री केवळ कॅमेरासमोर वंचितांचे पाय धुवून आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतात,’ घडलेल्या प्रकारासंबंधी अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.