बीड जिल्ह्यातील नांदूरघाटमध्ये तरुणानंमध्ये झालेल्या जातीय संघर्षाचे कारण नेमकं काय ?

Share News:

बीड जिल्ह्यातील नांदूरघाट गावात १५ मे रोजी दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीची घटना निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर घडली. भगवान बाबा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्यामधील रस्त्यावरच ही दगडफेक झाली होती. हि घटना का घडली आणि ह्याच्या मागचं कारण काय जाऊन घेऊयात. | Report By Megha Mahajan |

“मराठा समाज आणि वंजारी समाज यांचे एकमेकाचे बांधाला बांध आहेत आणि त्यांचं कुठंही वितुष्ट नाही. पण या समाजामधले आणि त्या समाजामधले काही तरुण एकमेकाला पोस्ट आणि कमेंट करतात. यातून एकमेकाला घाणघाण बोलतात. तो राग मनात धरल्यामुळे त्यांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.” तरुणांनी सोशल मीडियावरून होणाऱ्या भडकावणाऱ्या पोस्ट आणि कमेंट्सपासून सावध राहिले पाहिजे. “तरुणांनी एकमेकांवर हल्ला करण्याऐवजी संवाद साधावा, एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलावे आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.” असं तुकाराम जाधव यांचं वक्तव्य आहे
नांदूरघाट गावातील मराठा आणि वंजारी समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यातून सातत्यानं समोर आलं. परंतु, तरुण वर्गात मात्र जातीय अस्मिता तीव्रतेने जाणवते, असेही त्यांनी सांगितले.बीडची यावेळची लोकसभा निवडणूक पूर्णपणे जातीय मुद्द्यांवर केंद्रित झाली असल्याचे तुकाराम जाधव आणि सुरेश हांगे यांनी मान्य केले आहे. तुकाराम म्हणाले, “राजकारण्यांकडून तर दोन्ही समाजाचा वापर करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. विकासावर एकही राजकारणी बोलत नाही. बीड जिल्ह्याचा कसलाही विकास झालेला नाही. आणि इलेक्शन आले की फक्त जातीवर बोलणे, जातीचे मतं ओरबडून घेणे आणि कार्यभाग संपला की आपला आपला मार्ग धरणे.”सुरेश हांगे यांनीही याच विचारांना पाठिंबा दिला. ते म्हणाले, “निवडणूक जातीवर गेली ना 100 %. कारण निवडणुकीत, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, हे प्रश्न सगळे लांबच राहिले. बीडध्येच सगळ्यात जास्त जातीयवाद झाला, असं मला वाटतं.”

सोशल मीडियावर पोस्ट आणि कमेंट्समुळे निर्माण होणारा तणाव आणि द्वेष गावातील शांततेला धोका निर्माण करतो. या तरुणांच्या वर्तनामुळे गावात द्वेष आणि वैमनस्य वाढत आहे. ही समस्या फक्त नांदूरघाटची नाही, तर अनेक ग्रामीण भागांत अशीच स्थिती पाहायला मिळते.

गावातील शांती आणि सामंजस्य राखण्यासाठी तरुण पिढीने सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली येऊन हिंसाचार करणे हा कोणत्याही समस्येचे समाधान नसून, त्यामुळे केवळ विनाशच होतो. त्यामुळे तरुणांनी शांततेचा मार्ग अवलंबावा आणि परस्पर सहकार्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत.

बीड जिल्ह्यातील नांदूरघाट गाव बीडपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे. गावातील मराठा आणि वंजारी समाजांमध्ये सुप्त संघर्ष असून, हा संघर्ष कोणता गट मोठा हे दाखवण्यासाठी असल्याचे तरुण खासगीत सांगतात. मात्र, कॅमेऱ्यासमोर बोलण्यास ते टाळतात. निवडणुकीच्या काळात जातीय ध्रुवीकरणाला खतपाणी घालण्याची प्रक्रिया नवीन नाही, पण तरुण पिढी याला बळी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.

गावाला लागूनच हांगेवाडी, खाडेवाडी, आणि ढाकणवाडी अशी गावं आहेत. हांगेवाडी गावात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा बॅनर लावलेला आहे. या भागातही राजकीय नेत्यांच्या प्रभावामुळे जातीय ध्रुवीकरण दिसून येते.

हांगेवाडीच्या शिवारातील सुरेश हांगे म्हणतात कि गावातील घटनेविषयी बोलताना ते म्हणाले, “हे गट-तट पडण्याचं काही कारण नव्हतं. पण सोशल मीडियावर जी पोस्ट पडली ती ताईविषयी पडली. मग काय झालं दोन्ही समाजाचे समाजकंटक एकमेकांसमोर आले. यात खेडोपाडीचे बाहेरचे लोक गोळा झाले थोडेफार. मग इकडचे दहाएक जमले, तिकडचे दहाएक जमले आणि दगडफेक केली.”ही घटना नेमकी का आणि कशी घडली, हे समजून घेण्यासाठी बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीबीसी मराठीसोबत चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, “नांदूरघाटमधील एका व्यक्तीनं सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. दोन गट एकमेकांसमोर आले होते आणि दोघांनी एकमेकांवर दगडफेक केली होती.”पोलिस तपासानुसार, या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपी शोधण्याची मोहीम सुरू आहे. दोन्ही गटांकडून साधारणपणे 50 ते 60 लोकांची ओळख पटलेली आहे, आणि त्यांचा देखील शोध घेतला जात आहे. सध्या अटक केलेले आरोपी पीसीआरमध्ये आहेत.नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले की, “या प्रकारामुळे गावातील शांतता भंग झाली असून, आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. लोकांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणे आणि द्वेषपूर्ण पोस्ट टाकणे थांबवावे, अशी आमची विनंती आहे.”

लेखक-समीक्षक डॉ. गणेश मोहिते, जे बीडमधील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक होते, त्यांनी बीडच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, “बीडमध्ये शिक्षणाचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत. बीडला बेरोजगारी आणि सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. मग एवढे सगळे प्रश्न जेव्हा तुमच्यासमोर आ वासून उभे असतात, ते सुटत नाहीत तेव्हा तरुण पीढी सैरभैर होते. बीडमध्ये मराठ्यांमध्ये, वंजाऱ्यांमध्ये, सगळ्या जातींमध्ये तरुण टक्का मोठा आहे.“त्याच्या हाताला कामच नाही. मग मोबाईलमधून दीड जीबी डेटामधून त्यांना जे मॅटर पुरवलं जातं, जो सगळा कंटेट त्यांच्यासमोर येतोय तो ध्रुवीकरणाचा आहे. त्याला ती पिढी बळी पडू लागलीय.”

राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनीही या मुद्द्याला हात घातला आहे. ते म्हणतात, “तरुणांचं आज असं झालेलं आहे की, प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन पाहा मोठं खेडं असेल तर 300-400, लहान असेल तर 5-50, सुशिक्षित बेकार तरुण हिंडताहेत, त्यांना दुसरा कोणताही मार्ग नाहीये. दुसरं म्हणजे मुलांची लग्नं होत नाहीत, खेड्यामध्ये आणि शेतीमध्ये काम करणाऱ्याला तर कुणी मुलगी देतच नाही. आणि तिसऱ्या बाजूला त्यांना मोबाईलचं भयंकर वेड लागलेलं आहे.”

नांदूरघाटमध्ये झालेल्या जातीय संघर्षानंतर तुकाराम यांचे संपूर्ण कुटुंब अस्थिर झाले आहे. या घटनेने त्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. तुकाराम यांच्याकडे तरुण वर्गाला काही महत्त्वाचे सांगावेसे वाटते.तुकाराम म्हणतात, “तरुणांनो, तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे, तुमच्या व्यवसायाकडे आणि इतर प्रश्नाकडे लक्ष द्या. राजकारणामध्ये कुणाचंही काही चांगलं झालेलं नाही. फक्त राजकीय लोक तुमचा वापर करुन घेतात आणि मग सरळ सोडून देतात. त्यामुळे तुम्ही राजकारणाच्या मागे न लागता आपली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, आपल्या आई-वडिलांना, आपल्या बापाला आपण कसा सपोर्ट करू, एवढं केलं तरी भरपूर काही होईल.”

बीडमध्ये जातीय अस्मिता तीव्र झालेल्या आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट या तणावाला खतपाणी घालत आहेत. बीड पोलिसांनी या संदर्भात आतापर्यंत 100 जणांवर कारवाई केली आहे.

बीडमधील जाणकारांचे मत आहे की, तरुण पिढीला आपले पोटाचे प्रश्न महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. शिक्षण, रोजगार आणि आर्थिक स्थिरता हेच तरुणांच्या प्रगतीचे खरे साधन आहेत.

नांदूरघाटमधील जातीय संघर्षाच्या संदर्भात, लेखक-समीक्षक डॉ. गणेश मोहिते यांनी निवडणुकीच्या काळात प्रबोधनाऐवजी जातीय ध्रुवीकरणाला प्राधान्य दिले जात असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मोहिते सांगतात, “पूर्वी माध्यमांतून म्हणजे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियातून तुम्हाला थेट जातीयवाद करता येत नव्हता. आपण जेव्हा भेटू तेव्हाच आपल्याला जातीवर बोलता येत होतं. पण आम्हाला सोशल मीडिया हे सुरक्षित माध्यम मिळालं. त्यावर आम्ही आमच्या जातीचे समूह करू लागलो. आम्ही आमच्या जातीतल्या लोकांना एकत्र आणू लागलो. जातीच्या अनुषंगानं चर्चा घडवून आणू लागलो. त्यातून जातीय अस्मिता इतक्या टोकदार झाल्या की आम्ही जातीसाठी काहीतरी केलं पाहिजे.”

दुसरीकडे, सोशल मीडियाचा विघातक वापर करणाऱ्यांवर बीड पोलिसांची नजर आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीनंतर दोन समाजांमध्ये जरा भेद दिसून येतो आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहेत. त्याअनुषंगानं आम्ही याविरोधात कठोर भूमिका राबवली. आणि आतापर्यंत आपण जवळजवळ 100 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे, जे सोशल मीडियावर पोस्ट टाकताहेत.”“सोशल मीडिया जबाबदारीपूर्वक वापरला नाही, तर निश्चितच समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, हे तरुणांनी ओळखावं. स्वत:वर गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. पोलिसांना कुणावरही गुन्हा दाखल करण्याची हौस नाही, पण तरुणांनी जर संयम बाळगला तर आम्ही कुणावरही कारवाई करणार नाही. पण कुणी सांगूनही ऐकत नाही तर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल,” असंही नंदकुमार पुढे म्हणाले.

संकलन : मेघा महाजन

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!