दक्षिण भारतातील जातीअंताच्या चळवळीतील एक मुख्य नाव म्हणजे पेरियार अर्थात इरोड वेंकट नायकर रामसामी

Share News:

दक्षिण भारतातील जातीअंताच्या चळवळीतील एक मुख्य नाव म्हणजे पेरियार अर्थात इरोड वेंकट नायकर रामसामी. ज्यांना लोकांनी थानथाई (पिता) पेरियार (थोर व्यक्ती) या नावाने गौरवले, त्यांची आज जयंती. तामिळनाडूत स्वाभिमान चळवळ आणि द्रविड संघटना सुरु करून अस्पृश्य आणि पीडितांना सामान हक्क आणि न्याय मिळवून देणाऱ्या पेरियार ज्यांना ‘द्रविड चळवळी’ चे जनक म्हणून ही ओळखले जाते, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पेरियार यांचा जन्म तामिळनाडूतील इरोड या गावात एका कर्मठ हिंदू कुटुंबात झाला. १९०४ मध्ये ते काशीला गेले असताना भूक लागल्यावर ते अशा ठिकाणी गेले कि तिथे निःशुल्क भोजन मिळत होतं. मात्र तिथे जाऊन त्यांना कळालं की ते भोजन फक्त ब्राह्मणांसाठी आहे. भरपूर प्रयत्न करूनही त्यांना तिथल्या ब्राह्मणांनी अपमानित करून हाकलून लावले. या एका प्रसंगामुळे पेरियार हिंदुत्ववादी विचारांचा विरोध करू लागले. पुढे त्यांनी कोणत्याही धर्माचा स्वीकार न करता आयुष्यभर नास्तिक राहण्याचे ठरवले. 

 

पुढे जाऊन त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि त्रवणकोर इथे अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी झालेल्या वायकोम चळवळीचा ही ते भाग होते. या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास ही भोगावा लागला. पीडित आणि अस्पृश्यांना संघटित करून त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाचा विरोध केला. १९२५ साली स्वाभिमान चळवळ उभी करून पीडितांना त्यांचा हक्क मिळवून दिला. एवढाच नाही तर त्यांनी आंतरजातीय विवाह आणि विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. त्यांनी देवदासी प्रथेलाही विरोध केला.

 

त्यानंतर १९३७ मध्ये त्यांनी हिंदी भाषेविरोधात आंदोलन सुरु केले. १९४४ साली त्यांनी जस्टीस पक्षाचे रूपांतर द्रविड कळघम या नवीन पक्षात केले. सार्वभौम व वर्णभेदरहित अशा द्रविडनाडूची स्थापना हे त्यांच्या द्रविड कळघम पक्षाचे मुख्य ध्येय होते. मात्र नंतर त्या पक्षात फूट कडून द्रविड मुन्नेत्र कळघम हा दुसरा पक्ष तयार झाला. असे असूनही पेरियार यांचा समाजातील प्रभाव कमी नाही झाला. १९७१ साली अंधश्रद्धा निर्मूलन संमेलन आयोजित केले आणि त्यात जात, धर्म, लिंग आणि भाषा यांच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला त्यांनी विरोध दर्शवला. पेरियार यांनी १९५३ साली देवतांच्या मूर्ती तोडण्याचे आंदोलन पुकारले. “ज्या देवतांनी आम्हाला जन्माने अस्पृश्य आणि इतरांना ब्राह्मण असे बनवून जो भेद केला त्या देवतांचा मी सर्वप्रथम विरोध करत आहे”, असे म्हणत त्यांनी रस्त्यावर उतरून गणपतीच्या मूर्ती तोडल्या.

 

व्हाय द राइट्स फॉर कम्यूनल रिझर्व्हेशन, द वर्ल्ड टू कम, वर्ड्स ऑफ फ्रीडम : आयडिया ऑफ नेशन, खरं रामायण हे त्यांचे काही ग्रंथ आहेत. तामिळनाडूत पेरियार यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी केली जाते. पण पेरियार यांचे विचार फक्त तामिळनाडू पुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात त्यांच्या विचारांचा गौरव करून त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला पाहिजे.

– मल्लिका जयश्री सिद्धार्थ

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *