संपादक : – मल्लिका जयश्री सिद्धार्थ
सावित्री बाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी आपण परिचित आहोतच. त्यांनीच सुरु केलेल्या ‘सत्यशोधक समाजा’ ला आज १५० शे वर्ष पूर्ण झाली.
वर्षानुवर्षे ज्या उपेक्षित समाजाने इतरांची गुलामी केली, छळ आणि अन्याय सहन केला, त्या समाजाला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि या गुलामगिरी विरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी महात्मा फुलेंनी ‘गुलामगिरी’ हे पुस्तक लिहिले. मात्र या गुलामगिरीच्या विरोधात जाऊन चळवळ उभी करण्याचा उपदेश फक्त पुस्तकातून देऊन चालणार नव्हते. त्या चळवळीसाठी एक ठोस व्यासपीठ म्हणजेच संस्था किंवा संघ निर्माण करणे गरजेचे होते. त्यावेळी प्रार्थना समाज, आर्य समाज यांची स्थापना झाली होती. पण या समाजांद्वारे बहुजनांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत होते. उपेक्षितांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे महात्मा फुले यांना वाटले. आणि याच गरजेतून सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. मुळाशी जाऊन सत्याचा शोध घेणारा असा हा सत्यशोधक समाज. समाजाचे घोषवाक्य ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ असे होते.
महात्मा फुलेंनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात सत्यशोधक समाजाचे विचार, मानवता धर्म या बद्दल लिहिले आहे. हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा मुख्य ग्रंथ मानला जातो. या समाजाद्वारे जातिभेदाला, अनिष्ठ रूढी-परंपरांना आणि पाप – पुण्य, स्वर्ग – नरक, पुनर्जन्म व कर्मकांड या गोष्टींना विरोध केला गेला. ईश्वर हा एकच आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही भटाची गरज नाही, असे विचार सत्यशोधक समाजात मांडले गेले. सत्यशोधक समाजाचे मुख्य हेतू उपेक्षितांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे हेच होते. या समाजाद्वारे सती प्रथा व बालविवाह बंद पाडणे तसेच विधवा पुनर्विवाह ला समर्थन करणे अशा गोष्टी देखील घडत होत्या. इतकेच नाही तर मंगलाष्टका मराठीत रचून पुरोहितांशिवाय लग्न ही लावली जात होती. १८७७ मध्ये समाजातर्फे ‘दीनबंधू’ नावाचे एक साप्ताहिक ही सुरु झाले. या साप्ताहिकातून जनजागृती केली जाई.
महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे काम थोडे मंदावले. पण त्यांच्या कामाने प्रेरित होऊन छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला पुनरुज्जीवित केले. महाराजांनी अशा धार्मिक समारंभाचे आयोजन केले कि तिथे पुरोहितांना बोलावलेच नाही. त्यांनी गरजू, अभ्यासू बहुजन समाजातल्या मुलांसाठी शिष्यवृत्त्या सुरु केल्या. समाजात शिक्षणाचं महत्व सांगितले.
सत्यशोधक समाजाने प्रेरित होऊन आधुनिक काळात दलित आणि बहुजनांसाठी बऱ्याच चळवळी उभ्या राहिल्या. या सर्व चळवळींचा पाया सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचे विचार हाच आहे. १८७३ साली सुरु झालेल्या या समाजाचे विचार आजही लोकांपर्यंत पोहोचत आहे. मात्र समाजात या विचारांमुळे कितपत बदल घडला आहे हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।