विशद हडमतीय हे गाव भारतातील पहिलं गाव ठरलंय की जिथले दलित आता हिंदू नाही राहिले.

Share News:

अडीच हजार लोकसंख्या असलेलं गुजरातच्या विशद हडमतीया गावातील ७५ दलित कुटुंबातील ५०० लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला. विशद हडमतीय हे गाव भारतातील पहिलं गाव ठरलंय की जिथले दलित आता हिंदू नाही राहिले.

गुजरात मधील जुनागढ जिल्ह्याच्या मुख्यालयापासून २२ किलोमीटर लांब असलेल्या भेसन जिल्ह्यातील विशद (विशाल) हडमतीया या गावाची काही दिवसांपूर्वी काहीच ओळख नव्हती. मात्र २१ मे ला घडलेल्या घटनेनंतर या गावाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

वर्षानुवर्षे जातीय भेदभाव सहन करत असलेल्या या गावातील सर्व ७५ दलित कुटुंबांनी एकाच वेळी हिंदू धर्माचा त्याग करून दीक्षा घेऊन बौद्ध धम्म स्वीकारला. विशद हडमतिया हे आता भारतातील एक असे गाव म्हणून ओळखले गेले आहे की जिथे सर्व अनुसूचित जातीच्या लोकांना बौद्ध म्हटले जाईल. बौद्ध धम्माच्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचा संकल्प केला आहे ज्यामध्ये प्रत्येकाशी समता, समानता, करुणा आणि बंधुतेने वागणे, जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, नशा आणि अहंकारापासून दूर राहणे याला प्राधान्य दिले आहे.

धम्माची दीक्षा घेतल्यानंतर नवबौद्धांच्या जीवनात हिंदू प्रथा, सण, श्रद्धा, कर्मकांड यांना स्थान उरले नाही. भजन, कीर्तनाऐवजी आता त्यांच्या वस्तीत बुद्धवंदनेचा नाद ऐकू येतो.

विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या सुमारे अडीच हजार असून यामध्ये ७५ दलित कुटुंबातले ५०० सदस्य आहेत. काही आदिवासी लोक देखील आहेत ज्यांची संख्या तुलनेने कमी आहे. साक्षरता दर सुमारे ७५ टक्के आहे आणि बहुतेक लोक शेती आणि मजुरीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करतात. बरेच लोक सकाळी ८ वाजता जवळच्या गावात आणि शहरांमध्ये कामासाठी निघतात आणि संध्याकाळी ७ वाजता घरी परततात.

सनातन धर्माने अपमान केला आणि बाबासाहेबांनी मार्ग दाखवला
गावात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे श्रेय ५० वर्षीय मनसुखभाई वाघेला यांना जात. ते स्वतः २०१३ पासून बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत. १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण न झाल्याची खंत असलेले मनसुख भाई हे व्यवसायाने मजूर आहेत पण त्यांनी बाबासाहेबांची शिकवण आणि गौतम बुद्धांचे पंचशील ज्ञान लक्षात ठेवले आहे.

बाबासाहेबांनी शिक्षणाला दिलेल्या महत्त्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की मनसुखभाईंनी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण दिले, त्यामुळेच आज त्यांच्या मुलीने आयटीआयमधून फैशन तंत्रज्ञाचा कोर्स केला आहे. त्यांना एक मुलगाही आहे जो महाविद्यालयीन शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभा राहिला आहे. तर धाकटा मुलगा अजूनही शाळेत आहे.

द मूकनायक यांच्याशी झालेल्या संवादात मनसुख भाई यांनी हडमतिया गावातील जातीय भेदभाव आणि अत्याचाराच्या परिस्थितीचे वर्णन केले. “माझ्या लहानपणी जातिभेद खूप होता, तो आता खूप कमी झाला आहे, पण आजही आमच्या लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उच्चवर्णीय लोक अपमानित करतात. त्यांच्यासाठी आमचं मंदिरात जाणे व्यर्थ आहे. आम्हाला कोणत्याच कार्यक्रमात सहभाग नाही घेऊ देत”, असे मनसुख भाई म्हणतात. मनसुखभाई हे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे भेसन तालुक्याचे अध्यक्ष असून त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात बौद्ध धम्माच्या प्रचाराचे कार्य सुरू राहिले.

“सनातन धर्माने लोकांना भेदभाव आणि अस्पृश्यतेचा धडा शिकवला आहे, आम्हा खालच्या जातीच्या लोकांना अजूनही गावातले वरच्या जातीचे लोक तुच्छतेने बघतात. न्हावी आमच्या लोकांचे केस कापत नाहीत कारण त्यांची अशी समाज आहे की असे केल्याने इतर लोक त्याच्या दुकानात येणार नाहीत”, गावातील जेष्ठ नारायण वाघेला, ७५, द मूकनायकला सांगतात. नारायण सांगतात की, याआधी दलित समाजातील लोक त्यांचा विरोध नव्हते करत. पण काळानुसार जागरुकता आणि शिक्षणामुळे दलित समाज भेदभावाविरुद्ध आवाज उठवू लागला आहे.

गरबा कार्यक्रमात सहभागी होऊ देत नाही.
गावातील सुनैना नावाची मुलगी ‘द मूकनायक’शी केलेल्या चर्चेत सांगते, “नवरात्रीच्या काळात जेव्हा गुजरातमध्ये गरबा साजरा होत असतो, तेव्हा तिच्यासारख्या अनेक दलित मुली चांगल्या पोशाखातल्या लोकगीतांवर नाचणाऱ्या मुलींकडे तळमळीने पाहत असतात. गावातील सामूहिक रास गरबा कार्यक्रम त्याकडे ती खेदाने बघायची. सुनैना म्हणते, “आम्हाला दांडिया रासमध्ये सामील करत नाही कारण हे फक्त गावातील उच्चवर्णीय लोकांसाठी आयोजित केले जातात”.

गावातील इतर लोक सांगतात की, एक काळ असा होता की दलित माणसांकडून पैसे घेतल्यानंतर दुकानदार त्यावर पाणी शिंपडून नोटा शुद्ध करायचे. “आता बाजारातील दुकानदार खालच्या जातीतील लोकांकडून सहज पैसे घेतात कारण हा त्यांचा व्यवसाय आहे. ते गावातील शाळांमध्ये भेदभाव करत नाहीत कारण त्यांना कायद्याची भीती वाटते पण तरीही सर्वसमावेशकतेचा अभाव आहे ज्यामुळे खूप त्रास होतो,” असे गावकरी गोविंदभाई सांगतात.

गावातील दलित कुटुंबांची वस्ती वेगळी आहे, ज्यामधली बहुतांश घरे पक्की आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने येथे मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. दोन खोल्यांच्या प्रत्येक घरात सरासरी ५-६ सदस्य एकत्र राहतात. रहिवाशांचा असा विश्वास आहे की बिकट आर्थिक स्थितीमुळे इतके वाईट वाटत नाही जितकं त्यांच्याच गावातील लोक त्यांच्याशी तिरस्काराने वागतात तेव्हा वाटत.

वर्षानुवर्षे विशद हडमतीया गावातील दलित कुटुंबांना त्यांच्या गावातील आणि बाहेरील सवर्ण लोकांकडून अपमान सहन करावा लागला. अशा स्थितीत गुजरातमध्ये बौद्ध धम्माचा वाढता प्रसार, स्वयं सैनिक दल, बौद्ध महासभा आदींसह अनेक आंबेडकरी स्वयंसेवी संघटनांच्या प्रभावामुळे लोकांमध्ये चैतन्य पसरू लागले आणि वर्षानुवर्षे होणाऱ्या अपमानातून ते मुक्त झाले. इतकी वर्ष अपमान सहन केल्यावर बाबासाहेब आणि तथागत बुद्ध यांनी दाखवलेल्या मार्गामुळे मुक्तीचा मार्ग दिसू लागला.

२१ मे रोजी भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या धम्म दीक्षा समारंभात प्रत्येकाने बौद्ध तत्त्वांनुसार आपले जीवन घडविण्यासाठी सुमारे पाच-सहा महिने सराव केला आणि बौद्ध धम्म आत्मसात केला. या कार्यक्रमाला बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बाबासाहेबांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि प्रवीण निखाडे, व्ही.एच.गायकवाड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

सरकारच्या मंजुरीत अडचण
हडमतीया गावातील दलित लोकांनी निर्धारित प्रक्रियेनुसार जिल्हाधिकार्‍यांकडे धर्मांतरासाठी अर्ज केला, परंतु सक्षम अधिकाऱ्याने कागदपत्रांमधील त्रुटी दाखवून आणल्या आणि त्या दुरुस्त करायला सांगितल्या, त्यानंतरच धर्मांतर होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मनसुख वाघेला म्हणाले की, बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर बरेच लोक आपली हिंदू नावे बदलतात, परंतु येथील एकाही गावकऱ्याने आपली नावे बदलली नाहीत कारण आधार कार्डसह इतर ओळखपत्रांमध्ये नावे बदलण्यासाठी लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

काहीही नवीन स्वीकारणे कठीण आहे.
लहानपणापासून रुजलेल्या चालीरीती आणि समजुती रातोरात सोडणे कठीण आहे, विशेषत: पुरुषांपेक्षा अधिक धार्मिक आणि स्वभावाने कोमल मनाच्या समजल्या जाणाऱ्या स्त्रियांना. गावातील जयंतीभाई यांची पत्नी जयश्री सांगते की, “घरातून देव-देवतांची चित्रे काढून टाकणे, पूजा, उपवास सोडणे, मरणावर अस्थिविसर्जन ण करणे इत्यादी निर्णय घेणे अवघड आहे. परंतु हिंदू धर्मात राहून एवढा भेदभाव सहन केला आहे की त्याच्यापुढे कोणतीही अडचण मोठी नाही.

आणखी एक महिला अंजू वाघेला सांगतात की, “बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर समाज अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त होईल, घरातील वाद संपतील आणि महिलांनाही समान दर्जा मिळेल ज्यामुळे गृहिणींही सशक्तता होतील”.

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक बौद्ध आहेत.
अमरावती (महाराष्ट्र) येथील भंतेजी आनंद (बौद्ध भिक्षू) हे विशद हडमतीया येथील ग्रामस्थांना धम्माची दीक्षा देणारे गेल्या 10 महिन्यांपासून गुजरातमधील अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार करत आहेत. भन्ते आनंद हे महाराष्ट्रातील रेल्वेचे लोकोपायलट होते ज्यांनी 20 वर्षे सरकारी सेवा सोडून आपले जीवन बौद्ध धम्मला समर्पित केले. त्यांना आता नोकरी सोडून 10 वर्षे झाली आहेत. वंचित समाजाला बौद्ध धर्माशी जोडून त्याचे कल्याण हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे.

‘द मूकनायक’ शी बोलताना करताना त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी १९५६ मध्ये महाराष्ट्रात बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर लाखो लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला. महाराष्ट्रात ९५ टक्के दलितांनी बौद्ध धम्म स्वीकारला असून ते सशक्त झाले आहेत. भन्ते आनंद म्हणतात की ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यांच्या जीवनात बदल झाले आहेत. त्यांचे राहणीमान आणि शिक्षण सुधारले आहे, दलित अत्याचाराच्या घटना कमी झाल्या आहेत आणि ते भेदभावमुक्त झाले आहेत. ते म्हणतात की गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये बौद्धांची संख्या झपाट्याने वाढली आहे कारण प्रांतातील दलित समाज जागरूक झाला आहे. भन्ते आनंद म्हणाले, “त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे आणि विशद हडमतीय येथे १००% दलित कुटुंबांनी धम्म दीक्षा घेणे ही केवळ गुजरातमधीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिली आणि ऐतिहासिक घटना आहे. अनेकांना प्रेरणा मिळाली आहे, गेले दोन दिवस अनेक शहर आणि खेड्यांमधून निमंत्रण मिळत आहे. येत्या काही दिवसांत राजकोट आणि इतर जिल्ह्यांमध्ये असे आणखी कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.

बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी त्रिशरण आणि पंचशीलचे पठण करून शेकडो लोकांना या २२ प्रतिज्ञा म्हणायला लावल्या ज्यात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतर हिंदू देव-देवतांना नाकारले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. बुद्धाला विष्णूचा अवतार न मानण्याची शपथ हाही या प्रतिज्ञेचा एक भाग होता. यात चोरी न करणे, व्यसनापासून दूर राहणे, समतेवर विश्वास ठेवणे, बुद्धाच्या अष्टांगमार्गाचे अनुसरण करणे आदी संकल्पांचाही समावेश आहे.

अनुवाद ;- मल्लिका जयश्री सिद्धार्थ
क्रेडिट्स –  मूकनायक

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *