नागपूरमधील ऐतिहासिक दिक्षाभूमी विकास प्रकल्पावर जनता मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. आर. एस. ए च्या इथे पार्किंगसाठी पुष्कळ जागा असून तिथे पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमी स्मारक समितीने पार्किंग का नाही केली? संपूर्ण नागपूरमध्ये खूप अशी खाली मैदाने आहेत जी सरकारच्या ताब्यात आहेत, सरकारने तिथे पार्किंगची सोय का नाही केली? गर्दीच्या दिवशी आम्हाला १-२ किलोमिटर दूर पार्कींग करावे लागते कारण वाहने इथपर्यंत येतच नाहीत तर ही पार्कींग कोणासाठी आणि कशासाठी? ही वास्तु टिकाऊ असली पाहिजे नाहीतर इथे येणाऱ्या लाखो लोकांचे नुकसान होईल. अशा अनेक प्रश्नांना घेऊन जनता या पवित्र वास्तुविषयी चिंता दर्वशवत आहे.
तीन – चार दिवसांपासून नागपूर दिक्षाभूमी येथे आंदोलन चालू आहे. सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यंत समाज येथे आंदोलन करत आहे. तर या बांधकामाला घेऊन १ तारखेनंतर निर्णय दिला जाणार आहे.
२००.३१ कोटी रुपये खर्च करून ऐतिहासीक विकास प्रकल्प दीक्षाभूमी स्मारक समिती सोबत राबविण्यात येत आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना प्रकल्प बांधणीसाठी नोडल एजन्सी कडून शासनाद्वारे नियुक्ती करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाचे डिझाईन, Design Associates INC या कंपनीला देण्यात आले असून या कंपनीला भारतातील अनेक सांस्कृतिक स्मारक बांधणीचा अनुभव आहे. दिक्षाभूमीच्या २२.८० एकर परिसरातील विविध स्थळे स्तूपांचे नवनिकरण आणि नूतनीकरण या प्रकल्पअंतर्गत आहेत. यात्रिका शिवपुरी दगडात कोरलेल्या रेली चैत्य कमानिंनी सुशोभित केले आहेत. दिक्षाभूमीच्या स्तूपाच्या प्रवेश द्वाराआधी चार तोरण द्वारांची निर्मिती करण्यात येणार असून हे चार तोरण द्वार सांची येथील तोरण द्वारांची प्रतिकृती आहे. सभोवताली असणारे भिंतीचे तट नव्याने शिवपुरी दगडात बांधण्यात येणार असून त्याची सभोवताली लांबी ४०३ मीटर तर उंची २.४ मीटर असणार आहे. हे भिंतीचे तट सांची, भरुत, अमरावती येथील अशोक स्तंभाच्या हर्मिका रेलिंग पासून प्रेरित आहेत. दिक्षाभूमी परिसरात उच्च दर्जाचे व्याख्यान केंद्र ११२८.७३ चौरस मीटर क्षेत्रफळ उभारण्यात येणार असून या केंद्रामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनाची माहिती लघु चित्र फितीच्या माध्यमांतून नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ५०० लोकांकरिता ११४०.७८ चौरस मीटर मध्ये ओपन एअर थिएटर उभारण्यात येणार आहे. या थिएटर मध्ये नागरिकांना धम्मदेश ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ११६०९.१६ चौरस क्षेत्रफळामध्ये तळघर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुख्य स्तूपामध्ये असलेल्या चार प्रवेश द्वारांची पुनर्निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रवेश द्वारांची रुंदी ६ मीटर आणि उंची ३.८ मीटर एवढी असणार आहे. दिक्षाभूमी परिसराच्या मुख्य स्तूपाच्या सभोवताल परिक्रमा मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गाची रुंदी ६ मीटर असणार आहे. दिक्षाभूमी परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रमांकरीता ३६८.७० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ग्रीन रूम व अँटी चेंबरच्या व्यवस्थेसह अतिशय उत्तम असे व्यासपीठ बांधकाम शिवपुरी दगडात करण्यात येणार आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्यक्षम नियोजन आणि सखोल सांस्कृतिक, सामाजिक मुळे प्रतिबिंबित करणारी तसेच मजबूत वास्तुशिल्प असलेली दिक्षाभूमी देशभरातील सांस्कृतिक स्थळांच्या विकासाचे एक चिन्ह असणार आहे. तर सुशोभनीकरणासाठी दिक्षाभूमीचा पुनर्विकास ठीक आहे पण ज्या पार्कींग मुळे दिक्षाभूमीला धोका आहे अशा पुनर्विकासाला आमचा नकार आहे असे जनतेने सांगितले.
या सर्व वादामुळे नागपूर येथे दुसऱ्यांदा पत्रकार परिषद भरवण्यात आली असून पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने जनतेशी संवाद साधला आहे. या परिषदेत बऱ्याच लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तर या दिक्षाभूमीवरील पार्कींगबद्दल तेथील जनता मत व्यक्त करताना म्हणते की हे जे वातावरण निर्मित झालं आहे ते पार्कींग वरील मुद्द्यामुळे… कारण भारतात जेवढी सुद्धा धार्मिक स्थळे आहेत त्याच्या आजूबाजूला कुठेही पार्कींग नाही. १९५६ पासून समाज येथे येत आहे अजूनपर्यंत पार्किंगची गरज कोणालाही भासली नाही तरी देखील येथे अंडरग्राऊंड पार्कींग का करायचं आहे?
अंडरग्राऊंड पार्कींग करण्याआधी तुम्ही हवा प्रदूषण केंद्र आणि ध्वनी प्रदूषण केंद्राची परवानगी घेतली आहे का? जेव्हा सिव्हिल टेक्नॉलॉजी जुनी होती तेव्हा या वास्तूचे बांधकाम झाले आहे आणि आता जे खोदकाम चालू आहे, जे ६० ते ७० फूट खड्डे खोदले गेले आहेत त्यामुळे भविष्यात या वास्तूचा पाया ढासळू शकतो. या सुरु झालेल्या खोदकामामुळेच बोधी वृक्षाच्या दोन फांद्या सुखल्या आहेत. हीच ती सुरुवात आहे, सर्व नष्ट होण्याची! का म्हणून दिक्षाभूमी स्मारक समिती विषयाची परीक्षा घेत आहे? अशी जोरदार टीका नागरिकांनी केली आहे.
यावर पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई हे स्पष्टीकरण देताना म्हणतात की “अंडरग्राऊंड पार्कींग ही दिक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी आहे. अंडरग्राऊंड पार्कींग वर फेरविचार नक्कीच केला जाईल. पसरलेल्या अफवांनुसार ही मेट्रोची पार्कींग असणार आहे असे म्हंटले जात आहे तर नाही इथे मेट्रोच स्टेशन होणार आहे नाही इथे मेट्रोची पार्कींग. ज्या कोणी ही अफवा पसरवली आहे त्यांनी NIT मध्ये RTI कराव आणि सांगाव. हि अफवा कोणीतरी मुद्दाम पसरवली आहे. जर सामान्य जनतेला वाटत असेल की कुठे गैरव्यवहार होतोय तर त्यांनी आम्हाला विचारावं. राहिला प्रश्न २०४ कोटींचा तो खर्च NIT मार्फत होणार आहे तुम्हाला पाहिजेच तर NIT ला पत्र लिहून RTI करून विचारू शकता. आमची काहीही हरकत नाही.”
अंडरग्राऊंड मध्ये एक ओपन थिएटर असणार आहे ज्यामध्ये धम्मदेशला किंवा बोधी धर्माला जोपासला जाईल आणि दुसरे सभागृह बाबासाहेबांच्या बद्दलची जी माहिती आहे त्यांची चित्र फित बघण्यासाठी असणार आहे आणि तिसरी पार्कींग. पुस्तकाचे स्टॉल्स तसेच राहतील त्यांना कोणताही धक्का लागणार नाही. सदर बांधकामामुळे मुख्य स्तुप आणि बोधी वृक्षाला कुठलाही धोका नाही.
“आपण दोन अडीच एकरची जागा निर्माण करत आहोत तर धम्मचक्र प्रवर्तन दिना वेळी किंवा १४ ऑक्टोबर ज्या दिवशी गर्दी जास्त असते त्यावेळी या विशिष्ट अंडरग्राऊंड पार्कींग चा वापर जर पाऊस किंवा उन जास्त असेल अशावेळी उभे राहण्यासाठी केला जाईल, असे दिक्षाभूमीवर सुरु असलेल्या नवीन बांधकामावर स्मारक समितीने स्पष्टीकरण दिले.”
तर आंदोलकांनी अनेक शंकांचा भडिमार स्मारक समितीवर केला आहे. लखनऊ मध्ये आंबेडकर पार्क जवळ सेंट्रल जेल होते तर भगिनी मायावतींने ते सेंट्रल जेल तोडून सरळ लखनऊच्या बाहेर बांधायला सांगितले तिथे १७०० करोडच्या मूर्त्या आहेत आणि तुम्ही केवळ २००.३१ करोडच्या प्रकल्पासाठी दिक्षाभूमीवरच पार्कींग करत आहात… असे म्हणत आंदोलकांनी निशाणा साधला आहे.
जनतेच्या व्यक्तव्यानुसार जिथे हजार किंवा पाच हजार लोकांची क्षमता आहे आणि त्यापेक्षा जास्त लोक तिथे गेले तर ऑक्सिज पातळी -२ किंवा -३ पर्यंत जाऊन कमी होऊन इतर समस्या निर्माण होऊ शकते. २० वर्षे झाली तरीही दिक्षाभूमीचा चौथा दरवाजा चालू केलेला नाही तर त्यासाठी सरकार बाजूच्या जागेची मागणी का करत नाही? ज्या गरजा आवश्यक आहेत त्या सरकार करत नाहीत. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये, बाथरूमस् ची सोय नाहीये तर ती व्यवस्था करावी. कोणतेही धार्मिक स्थळ प्रदूषित होऊ नये म्हणून पार्कींग ही त्यापासून २-२ किलोमिटर दूर असते आणि तुम्ही सरळ या वास्तूमध्ये अंडरग्राऊंड पार्कींग करत आहात जर उद्या कोणी अनावश्यक गोष्टी गाडीतून आणल्या तर याला जबाबदार कोण राहणार? आणि तुमचे पुनर्विकासाचे काम धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच १४ ऑक्टोंबरच्या आधी होणार आहे का? असे प्रश्न जनतेने समोर ठेवले आहेत.
जनतेला शांत करत स्मारक समितीने आश्वासन दिले आहे की “आम्हाला १-२ महिने कामाला विलंब करावा लागला तरी चालेल पण ऑक्टोबर मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा होणारच. आपल्याकडे जागेची फार कमतरता आहे म्हणून धर्मशाळा वगैरे इथे नसणार आहेत. उत्तरेकडे कृषी विभागाची जागा आहे आणि पूर्वेकडे आरोग्य विभागाची जागा आहे ती जागा आम्ही मागवत आहोत त्यानंतर आम्ही तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. दिक्षाभूमीवर स्टॉल्स सुद्धा ठेवले जाणार आहेत तर अधिकचे टॉयलेट्स सुद्धा तिथे केले जातील. सध्या आम्ही प्रथम लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. चौथ्या गेटचा जो प्रश्न आहे तर जसे तुम्ही उत्स्फूर्त इथे आला आहात असेच त्या जागेसाठी तुम्हाला आंदोलन करावं लागेल.”
“सातारा येथे बाबासाहेबांच्या आईचे स्मारक, रमाबाईंचे स्मारक तसेच इंदुमिलचे स्मारक अजूनही झालेले नाहीत. या सर्वांचा मेंटेनन्स हा खरच चिंतेची बाब आहे. मेंटेनन्स साठी आम्ही सरकारशी बोलणार आहोत. आम्हाला दोन वर्षामध्ये याची कायापालट करायची आहे. याचे नाव तर जगभरात आहेच आणि अजून व्हावं अशी आमची इच्छा आहे. या वास्तूचे सुशोभनिकरण करणे आणि अत्यंत देखणी अशी वास्तू बांधणे हे आमचे एकमेव उद्दीष्ट आहे,” असा खुलासा पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने केलेला आहे.
प्रतिनिधी : मृणाली जठार
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।