गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात थेट दिल्लीने लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. आधी केबिन, स्वीय सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवरचा अंबर दिवा यांच्याशी संबंधित असणारा पूजा खेडकर यांचा गैरव्यवहार आता थेट IAS मध्ये निवड होण्यासाठी चुकीची कागदपत्रे देण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट पंतप्रधान कार्यालयाने लक्ष घातले आहे. त्याशिवाय, सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी (LBSNAA) ने देखील पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र सरकारकडे मागवला आहे.
पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. मात्र, आता फक्त बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर यांनी आधी काही प्रमाणात अपंगत्वाच्या श्रेणीत अर्ज केला होता. नंतर पूर्ण अपंग श्रेणीत अर्ज केला. निवड झाल्यानंतर मात्र वैद्यकीय चाचणीसाठी सहा वेळा बोलवूनही त्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांमध्ये दिसून आलेल्या घोळामुळे आता त्यांना नोकरीतून बडतर्फ का करण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर दिल्लीहून पावले उचलली जाऊ लागली आहेत.
पूजा खेडकर यांच्या संदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे गैरवर्तन याच्या पार्श्वभूमीवर त्यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले असून बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतूनही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।