उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगात चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू; अंधश्रद्धेमुळे हाहाकार

Share News:

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी हाथरस मध्ये स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ भोले बाबा यांनी आयोजित केलेल्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा सत्संग दरवर्षी आयोजित केला जातो आणि मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. यावर्षीही सत्संगाला मोठी गर्दी होती. सत्संगात दिल्या जाणाऱ्या मातीसाठी लोकांची मोठी झुंबड उडाली, ज्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले.

यामध्ये महिला आणि लहान मुलांसह १२१ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रमाणापेक्षा जास्त लोक आल्याने ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.

आता या अपघाताबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. काल झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास सुरू करण्यात आला आहे. या चौकशीत असे समोर आले आहे की, बाबा ज्या मातीत पाय ठेवतात ती माती भाविक पवित्र मानतात. ती माती घरी आणल्याने सर्व संकटे दूर होतात असा त्यांचा विश्वास आहे. बाबांच्या मार्गावर रांगोळी सजवली जाते, आणि बाबा त्यावरून गेल्यानंतर महिला ती रांगोळी गोळा करतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे, आणि या मातीसाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

या घटनेत सर्वाधिक महिलांचा मृत्यू झाला आहे. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, या अपघातात १२१ लोकांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ७ मुले आणि १ पुरुष वगळता बाकी सर्व मृतांमध्ये महिला आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

भोले बाबा यांचं मूळ नाव सूरजपाल आहे. कासगंज जिल्ह्यातील बहादुर नगरचे ते मूळ निवासी आहेत. सूरजपालने १९९० च्या दशकात पोलीस कर्मचारी म्हणून करत असलेली नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी प्रवचन देण्यास आणि सत्संगाचे कार्यक्रम करण्यास सुरवात केली. सूरजपाल अर्थात भोलेबाबांना मूल बाळ नाही. त्यांची पत्नीही त्यांच्या बरोबरच सत्संगात असते. त्यांचे लाखो अनुयायी आहेत.

सूरजपाल उर्फ भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, जी इतकी भयंकर होती की काही वेळातच मृतदेहांचा ढीग पडला होता. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी सर्वजण जमले होते. आता या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, १२६ अंतर्गत (२), २२३ आणि २३८ अंतर्गत मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञात आयोजक आणि स्वयंसेवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण त्या एफआयआरमध्ये प्रवचन देणाऱ्या भोले बाबांचेच नाव नाही. दरम्यान, एफआयआरमध्ये भोले बाबाचे नाव नसल्याने मृतांच्या कुटुंबीयांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोक बाबांमुळे आले होते. त्यामुळे भोले बाबाला मुख्य आरोपी मानलं पाहिजे, असं स्थानिकांनी पीटीआयला सांगितले.

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आयोजकांनी ८० हजार लोकांच्या मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या कार्यक्रमात तब्बल अडीच लाखांहून अधिक जमले होते. तसंच, त्यांच्यावर पुरावे बदलण्यात आल्याचाही आरोप आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हाथरस येथे झालेल्या या प्रकरणामध्ये अंधश्रद्धेला बळी पडून अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे, अजूनही समाजात अंधश्रद्धेला बळी पडून किती जनांचा बळी जाणार आहे हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

प्रतिनिधी: मृणाली जठार

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *