‘जय संविधान’ ते ‘जय भीम’ च्या घोषणांसह १८ व्या लोकसभा अधिवेशनाला सुरुवात

Share News:

१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला २४ जून २०२४ रोजी विविध मुद्द्यांवरील सरकार आणि विरोधकांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरुवात झाली. अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली आणि नंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कनिष्ठ सभागृहातील नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. पीएम मोदींनी संसदेत पोहोचल्यावर सांगितले की “देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे आणि संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे. देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे.”

भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शपथविधीदरम्यान विरोधकांनी ‘NEET-NEET, शेम-शेम’ असे नारे दिले आणि एनईईटी पेपर हेराफेरीप्रकरणी त्यांचा राजीनामा मागितला.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर खासदारांनी शपथ घेतली. सोमवार आणि मंगळवारी ५३५ सदस्यांनी शपथ घेतली असून ७ सदस्यांचे शपथविधी अद्याप बाकी आहेत.

राहुल गांधी यांच्या शपथविधीदरम्यान काँग्रेस सदस्यांनी ‘भारत जोडो’चा नारा दिला, त्यांनी संविधानाची प्रत दाखवली आणि जय संविधान असा नारा दिला.


आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद यांनी ‘जय भीम, जय भारत, जय संविधान, जय जवान, जय किसान’ अशा घोषणांसह शपथ घेतली.

खासदार ओवेसी यांनी शपथविधीदरम्यान पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शविल्यामुळे झालेल्या वादानंतर भाजपाचे रवी किशन यांनी भोजपुरीमध्ये महादेव मंत्राने शपथ घेतली.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी भारतीय राज्यघटनेची प्रत दाखवून शपथ घेतली.

शिवसेना उबाठा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आई-वडील आणि बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून शपथ घेतली, परंतु अध्यक्षांनी त्यांना परत शपथ घेण्यास सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी ‘जय भीम, जय शिवराय,’ ‘रामकृष्ण हरी,’ आणि ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणांनी शपथविधी पूर्ण केले.

प्रतिनिधी: मृणाली जठार

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!