महाराष्ट्रात नुकताच एक वादग्रस्त प्रसंग घडला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनवधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेमुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, विविध राजकीय पक्षांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
बुधवारी, जितेंद्र आव्हाड महाड येथील क्रांती स्तंभाजवळ मनुस्मृतीच्या प्रकरणावरून राज्य सरकारविरोधात आंदोलन करीत होते. मनुस्मृतीचे पृष्ठे जाळताना, आव्हाड यांचे हातून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले गेले. या घटनेनंतर आव्हाड यांनी त्वरित माफी मागितली, परंतु विरोधी पक्षांनी त्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रामदास आठवले आणि इतर नेत्यांची प्रतिक्रिया
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा निषेध केला आहे. “आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी,” असे आठवले यांनी सांगितले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आव्हाड यांच्या अटकेची मागणी करण्याचे जाहीर केले.
वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. “जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे,” असे वंचितचे कार्यकर्ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. भाजप उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे,” असे बावनकुळे यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, “मी आंदोलनाच्या भावनेत गुंतलो होतो. मनुस्मृतीच्या पोस्टरवर बाबासाहेबांचा फोटो होता हे मला कळले नाही. माझी चूक अनवधानाने घडली आहे. मी माफी मागतो. जर कोणी म्हणत असेल की मी हे मुद्दाम केले तर ते मूर्खपणाचे आहे.”
मनुस्मृतीचे पृष्ठे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या योजनेविरोधात आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला होता. शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने राज्य शाळा अभ्यासक्रमाचा आढावा घेतला असून, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) चा समावेश केला आहे. यामुळे राज्यभरात चर्चेला तोंड फुटले आहे.
महाराष्ट्रातील या वादग्रस्त घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीवरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आणि निदर्शने सुरू आहेत.
Report by : अभिषेक खाडे
*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *
महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।