इलॉन मस्क यांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्यानंतर भारतातील विरोधीपक्षांच्या चर्चेला उधाण !

Share News:

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
लोकसभा निवडणूक निकाल लागून दोन आठवडे झाल्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम वापरण्यावरून पुन्हा गदारोळ सुरू झाला आहे. प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या अनेक कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांनी हॅकिंगच्या संभाव्य असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करताना, निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) न वापरण्याचा सल्ला दिला आहे.
मात्र, माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी आक्षेप दर्शवत, या आराेपामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे; तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) एकप्रकारचे ‘ब्लॅक बॉक्स’ आहे, ज्याला तपासण्याची परवानगी कोणालाच नाही, असा टोला लगावला आहे.
जगभरातील ईव्हीएमच्या सुरक्षेवर वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, विशेषत: पोर्तो रिकोच्या अलीकडील प्राथमिक निवडणुकांमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपांनंतर त्यांची ही टिप्पणी आली आहे. या संदर्भात आपल्याच मालकीच्या सोशल मीडिया एक्सवर एका पोस्टमध्ये मस्क म्हणाले, ‘आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकली पाहिजेत. मानव किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे हॅक होण्याचा धोका कमी असला तरी त्याचा परिणाम खूप जास्त हाेताे.’ पोर्तो रिकोमध्ये अलीकडच्या वादांमुळे ईव्हीएम सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तेथील प्राथमिक निवडणुका ईव्हीएमशी संबंधित अनेक गैरप्रकारांनी गाजल्या होत्या. मस्क यांनी शंका उपस्थित केल्यानंतर भारतातील विरोधीपक्षांना नवा मुद्दा मिळाला आहे.

ईव्हीएम हॅक करण्याचा कोणताही मार्ग नाही – एक्सवर मस्क यांना उत्तर देताना भाजप नेते राजीव म्हणाले की, ‘कोणीच सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही,’ असे इलॉन मस्क यांना म्हणायचे आहे; पण ते अमेरिका आणि इतर देशांबद्दल बोलत असावेत; कारण तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेली मतदान यंत्रे बनवतात; पण भारतात बनविलेली ईव्हीएम अत्यंत वेगळ्या प्रकारे बनवलेली आहे.
या ईव्हीएममध्ये कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही, ब्लूटूथ नाही, वायफाय नाही, इंटरनेट नाही; त्यात कोणताही मार्ग नाही, ज्याने ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात. यासाठी कंपन्यांमध्ये तयार केलेल्या कंट्रोलर्समध्ये पुन्हा प्रोग्रामिंग करता येत नाही. इलॉन यांना याबद्दल माहिती देण्यास आम्ही उत्सुक आहोत.
भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल जगभरात सध्या गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये जबाबदारी नसते, तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि हेराफेरीची शक्यता वाढते, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी पुन्हा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञान’ समस्यांचे कारण बनल्यास त्याचा वापर बंद केला पाहिजे.

अशा प्रकारे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात लागलेला निकाल वादात सापडला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव केला. मात्र या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी केलाय. अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीच्या खोलीत मोबाईलचा वापर केला होता. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्याने त्यांना मोबाईल पुरवला होता. त्यानंतर मिळालेल्या तक्रारीवरुन वनराई पोलिसांनी रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आलं आहे. पोलीस तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले. पंडीलकर यांच्याकडे जो मोबाईल सापडला तो दिनेश गुरव यानेच त्यांना दिला होता. हा मोबाईल ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला होता. पोलिसांनी हा मोबाईल जप्त करुन फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.

या प्रकरणावरुन आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवं असं म्हटलं आहे.
ईव्हीएमशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. “मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता. एनडीएचा हा उमेदवार केवळ ४८ मतांनी विजयी झाला आहे.अशा परिस्थितीत प्रश्न आहेत. एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला? शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे,” असं काँग्रेसने म्हटलं आहे.

शिवसेना नेते आदित्य यांनीदेखील यावरुन जोरदार टीका केली. “एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार असतो. मिंधे गटाच्या उत्तर पश्चिमच्या उमेदवाराने लोकशाहीसोबत विश्वासघात केला आहे. निवडणूक आयोग सीसीटीव्ह फुटेज देत नाही, यातून आयोगाचा सुद्धा यात सहभाग असल्याचे दिसून येते. चंडीगड प्रकरणात झालेल्या प्रकारात त्यांची प्रतिमा मलीन झाली होती, तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून ही दृश्ये दिली जात नाहीत. भाजपा आणि मिंधे गटाला लोकशाही संपवायची आहे आणि संविधानही बदलायचे आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आपण पाहिले की, इलॉन मस्क यांनी ईव्हीएमबद्दल ट्वीट केले. तसेच आम्ही सर्वजण ईव्हीएमबाबत बोलत आहोत. इलॉन मस्क यांचा तंत्रज्ञानाबद्दल एवढा विश्वास असूनही त्यांना ईव्हीएमबद्दल विश्वास नाही. तुम्ही जर फोनवरून ओटीपीने ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकते. आता मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात घोळ झाल्याची चर्चा आहे. यानंतर निवडणूक आयोगाने तेथील सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकांचा भाजपावर प्रचंड राग होता. त्यामुळे भाजपाला लोकांनी २४० वर आणले आहे. ईव्हीएम नसते तर २४० पर्यंतही पोहोचले नसते. भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. एकजण ४०० पारच्या घोषणेबद्दल बोलतो, तर दुसरे आणखी काही बोलतो. आता निवडणूक होऊन गेली आहे. लोकांनी त्यांना जागा दाखवली. इंडिया आघाडी २३७ वर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची पूर्णपणे खात्री मला आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

ईव्हीएमला अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही, असा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. एकीकडे रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याकडील मोबाईल प्रकरणावर आयोगाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असताना एकंदरीतच या प्रकरणावर हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच मतदान केंद्रात फक्त वायकरांच्या मेहुण्याकडेच नाही तर वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल होता, असा गौप्यस्फोट शाह यांनी केला आहे.

मतमोजणीवेळी मोबाईल नेण्यास परवानगी नसतानाही वायकर यांचे मेहुणे आणि मुलगी सतत मोबाईलवरून बाहेर संवाद साधत होते. त्यांना वायकरांचेही फोन येत होते. हे आम्ही पाहिले. यावर आक्षेप घेत आम्ही पोलिसांना हे मोबाईल ताब्यात घेण्याची विनंती केली. परंतु पोलीस आम्हाला गांभीर्याने घेत नव्हते. आता तर पोलिसांनी ताब्यात घेतलेला फोनही बदलला गेला असेल असा आम्हाला संशय असल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला आहे.
याचबरोबर तक्रार आम्ही केली होती ती न नोंदविता तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला? या गुन्ह्यात वायकर यांच्या मुलीचे नाव कसे काय वगळण्यात आले? पोलीस कोणाच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत असे प्रश्न शाह यांनी केले आहेत.

तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला” असं म्हणत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
“वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) retired. पी आय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे.”
“रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वादग्रस्तफ़ोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे ऐकले. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणांत बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात!” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

इव्हीम अनलॉक करायला कोणताही ओटीपी लागत नाही. इव्हीम टेक्निकली फुल प्रूफ सेकयूर असून मोबाईलमुळे इव्हीम हॅक होत नाही, अशी स्पष्टोक्ती २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी रविवारी सायंकाळी वांद्रे पूर्व उपनगर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
मतमोजणीच्या वेळी १५८,जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातला निवडणूक आयोगाचा डाटा एन्ट्री ऑपरेटर दिनेश गुरव यांनी त्यांचा मोबाईल येथील एका अनोळखी व्यक्तीला दिल्याची तक्रार अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांनी आपल्याकडे दिली. त्यावेळी मतमोजणी आपल्यासाठी महत्वाची असल्याने आपण आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत आपण वनराई पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले.
त्यानंतर दि,५ रोजी आपण संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे पत्र पोलिसांना दिले. आपल्या कडून तक्रार दाखल झाली पाहिजे असे पोलिसांनी आपल्याला दि,११ जून रोजी कळवले.दि,१३ रोजी नायब तहसीलदारांनी वनराई पोलिस ठाण्यात गुरव विरुद्ध रितसर तक्रार केली असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी आपल्याकडे सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली होती, मात्र कायदेशीर तरतूदी शिवाय आम्हाला सील केलेले सीसीटीव्ही फूटेज देता येत नाही, न्यायालयाच्या आदेशाशिवाय आम्हाला ते बघता सुद्धा येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांना आपण मदत केली असा विरोधकांचा आपल्यावर आरोप आहे असे विचारले असता,मी पहाटे ५ पासून ते रात्री उशिरा पर्यंत मतमीजणीच्या कामात व्यस्त होते आणि निवडणूक आयोगाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले.कोणी आरोप करावे हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले.
७.५३ मिनीटांनी रवींद्र वायकर हे टपाल मतमोजणीत ४८ मतांनी विजयी झाल्याचे मी घोषित केले,परंतू पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा फेरमतमोजणीचा अर्ज हा ८.०६ मिनिटांनी विहित वेळेनंतर आल्याने त्यांचा अर्ज नियमानुसार ग्राह्य धरण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकाल जाहिर केल्यानंतर विहित वेळेत दोन मिनिटांमध्ये त्यांनी हरकत घ्यायला हवी होती अशी माहिती त्यांनी दिली.
२६ व्या फेरीनंतर अमोल किर्तीकर हे एक मतानें पुढे होते.मात्र त्यावेळी वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.टपाल मतांमध्ये बाद झालेल्या १११ मतांचे रिव्हेरीफिकेशन करण्यात आले. त्यात काही तथ्य आढळले नाही आणि वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Report By : Mrunali Jathar

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *